टी-20 विश्वचषकाच्या तयारीला सध्या प्रचंड वेग आला असताना टी20 विश्वचषक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सुरू होणार का, की त्यामध्ये बदल होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपासून बांगलादेश नेमका टी20 विश्वचषक खेळणार का ? याबाबत साऱ्या जगाचं लक्ष लागून होत. बांगलादेशने भारतात येऊन सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांची इच्छा श्रीलंकेत सामने खेळण्याची होती, पण त्यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
त्यामुळे आता आयसीसीकडून मोठी घोषणा होणार असून, बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आयसीसीकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. स्कॉटलंडचा समावेश त्याच गटात होईल, ज्यामध्ये बांगलादेश होता. विश्वचषक सुरू होण्यासाठी केवळ १५ दिवस उरले असल्याने स्कॉटलंडला तातडीने तयारी करत आपला संघ जाहीर करावा लागणार आहे.
टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. बांगलादेशचे जे सामने होते, तेच सामने आता स्कॉटलंड खेळणार आहे. टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या दिवशी एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना सकाळी 11 वाजता पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबो येथे होईल. दुसरा सामना दुपारी 3 वाजता कोलकात्यात वेस्ट इंडिजचा असेल. तर तिसरा आणि दिवसातील सर्वात मोठा सामना संध्याकाळी 7 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल, जिथे भारत आणि यूएसए आमनेसामने असतील.
बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला, म्हणजेच उद्घाटनाच्या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्यात होणार होता. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे आयसीसीला अंतिम निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा लागणार असून, स्कॉटलंडलाही झटपट तयारीला लागावे लागणार आहे.म्हणजेच स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून चाहत्यांना थरारक क्रिकेटचा अनुभव मिळणार आहे.