आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. याआधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुरुषांचा टी-२० वर्ल्ड कप २०२६ हा ७ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ८ मार्च रोजी अंतिम सामना होईल. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, बांगलादेशला कोलकात्यात तीन तर मुंबईत एक सामना खेळायचा होता.दरम्यान, एका वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आयसीसीकडे महत्त्वाची मागणी केली असून, भारतात भारतातील आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी विनंती केली आहे.
या मागणीवर आयसीसीने गांभीर्याने दखल घेतली असून, चेअरमन जय शाह यांच्या नेतृत्वाखाली नव्या वेळापत्रकावर काम सुरू करण्यात आल्याचे समजते. ही मागणी अशा वेळी पुढे आली आहे, जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्यास सांगितले होते.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय कोणताही वाद वाढवण्यासाठी नसून, केवळ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे. त्यामुळे आयसीसीने परिस्थितीची गंभीरता ओळखून बांगलादेशचे सर्व सामने भारताबाहेर, सुरक्षित ठिकाणी आयोजित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रीलंका हा स्पर्धेचा सह-यजमान असला तरी, सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे सर्व ग्रुप स्टेज सामने भारतातच होणार आहेत. यामध्ये चारपैकी तीन सामने कोलकात्यात, तर एक सामना मुंबईत खेळवण्यात येणार आहे.