बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाही. बांगलादेशमध्ये अनेक हिंदू तरुणांची हत्या केल्यानंतर आता एका ४० वर्षीय विधवा महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तसेच तिचे केस कापून तिला विवस्त्र अवस्थेत झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
शनिवारी संध्याकाळी पीडितेचे दोन पुरुष नातेवाईक तिला भेटायला आले होते. हीच संधी साधून काही समाजकंटक पीडित महिलेच्या घरात घुसले. त्यांनी नातेवाईकांना एका खोलीत कोंडून ठेवले. नराधमांनी महिलेला दुसऱ्या खोलीत नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.पीडितेने प्रतिकार केला असता, तिला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही; त्यांनी महिलेचे केस कापले आणि तिला एका झाडाला बांधून झाडाला बांधून मारहाण करत पळ काढला.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपींनी महिलेला तोपर्यंत टॉर्चर केले जोपर्यंत ती बेशुद्ध पडत नाही. आरोपी गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी सांगितले की, सुरूवातीला महिलेने तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितले नव्हते. पण तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यासोबत बलात्कार झाल्याचे उघड झाले. पीडित महिलेने हिंमत दाखवत सोमवारी दुपारी कालीगंज पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव हसन (४५ वर्ष) असल्याचे समोर आले आहे. हसन हा पीडितेच्या परिसरातीलच एका गावातील रहिवासी असून, तो या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा संशय आहे. उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समाजात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.