लहान पणापासूनच आपल्याला शिक्षक हे आपले दुसरे आई वडील आहेत हे आपल्याला सांगितले जाते. मुलं शाळेत गेल्यानंतर मुलांची जबाबदारी घेण्यासाठी शिक्षक आहेत असा विश्वास ठेवत आई वडीलही निश्चित असतात. पण याच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. यवतमाळमधून देखील अशीच शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
प्रायव्हेट ट्यूशनच्या नावाखाली शिक्षकानं १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडिता गर्भवती राहिली. धक्कादायक म्हणजे त्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. गर्भपाताच्या गोळ्या अतिप्रमाणात खाल्ल्याने तिची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान, मृत्यू झाला.
यवतमाळमधील एका गावात आरोपी खासगी शिकवण देत होता. त्यानं पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तसेच तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. आरोपी वारंवार शिकविण्याच्या बहाण्यानं तिला घरी बोलावुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.
गोळ्यांचा ओव्हरडोज झाल्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले. तसेच ती आजारी पडली. तिची प्रकृती खालावली. पीडितेनं कुटुंबियांना प्रकृती ढासळली असल्याची माहिती दिली. अल्पवयीन मुलीला तातडीने नांदेड येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपास करत शिक्षकाला अटक केली आहे.