दैनिक भ्रमर : अमरावतीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अॅसिड हल्ला झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. अमोल इसाळ असं या प्रकरणातील पीडित तरुणाचं नाव आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबुळगावचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल इसाळ हा तरुण अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तो बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावमध्ये रविवारी दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी काही तरुणांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर अकोला खामगाव महामार्गावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मारहाण केली. त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि इतर वस्तू हिसकावून घेत त्याच्यावर अॅसिड फेकलं. हल्ल्यानंतर आरोपींनी अमोलला रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला.
या घटनेनंतर काही नागरिकांनी तत्काळ अमोलला खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी त्याच्या मूळ गावी यवतमाळच्या बाभुळगाव येथे पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, अमोलच्या मोठा भाऊ स्वप्निलने हा हल्ला अमोलच्या रूम पार्टनरने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अमोल आणि त्याचा रूम पार्टनरमध्ये यांच्यात गेल्या दीड महिन्यापासून वाद सुरु होते, त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असावी, असा अंदाज आहे. आता या प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करत आहे.