ऐतिहासिक ! फेरमतमोजणीतून निकाल बदलला; जिंकलेला हरला आणि हरलेला जिंकला
ऐतिहासिक ! फेरमतमोजणीतून निकाल बदलला; जिंकलेला हरला आणि हरलेला जिंकला
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : सुप्रीम कोर्टाच्या निकाल आला अन ग्राम पंचायतीच्या निवडणूक हरलेला उमेदवार विजयी झाला. ही घटना आहे पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू ग्राम पंचायतीची. बुआना लाखू ग्राम पंचायतीच्या निवडणूक निकालावरुन वाद सुरू होता. हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाच्या निकालानंतर मतांची फेरमोजणी करण्यात आली. त्यासाठी ईव्हीएम मागवण्यात आली. मतमोजणीनंतर हा संपूर्ण निकालच फिरला.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएममधला निकाल चुकीचा ठरला आहे.  हरियाणामधल्या पानिपत बुआना लाखू गावातला सरपंच बदलला आहे. ज्या सरपंचाला विजयी घोषित करण्यात आलं होतं, त्याला आता पराभवाचा धक्का बसला आहे. तर जो सरपंच हरला होता, तो जिंकला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण तब्बल दोन वर्षांपूर्वीचं आहे.

नेमके प्रकरण काय ? 
बुआना लाखू पंचायतीची निवडणूक २ नोव्हेंबर २०२२ रोजी झाली होती. कुलदीप सिंह यांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मोहित कुमार यांनी आक्षेप नोंदवला. त्यांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करत निकालाला आव्हान दिलं. २२ एप्रिल २०२५ रोजी अतिरिक्त सिव्हिल जज यांनी बूथ नंबर ६९ मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले. 

स्थानिक न्यायालयाच्या आदेशाला कुलदीप यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिलं. उच्च न्यायालयानं कनिष्छ न्यायालयाचा आदेश रद्द केला. त्यामुळे मोहित कुमार सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. ३१ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सगळ्याच बूथवरील ईव्हीएम आणि निवडणूक रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले. सगळ्या बूथवरील मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ६ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात रजिस्ट्रार यांच्या देखरेखीखाली दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत फेरमतमोजणी करण्यात आली. या मोजणीनुसार मोहित कुमार यांना १०५१, तर कुलदीप सिंह यांना १००० मतं मिळाली. रजिस्ट्रारनं फेरमतमोजणीचा अहवाल न्यायालयाला सोपवला. 

सर्वोच्च न्यायालयानं मोहित कुमार यांची निर्वाचित सरपंच म्हणून घोषणा केली. दोन दिवसांच्या आत अधिसूचना जारी करुन मोहित कुमार यांना निर्वाचित सरपंच घोषित करण्याचे आदेश न्यायालयानं पानीपतच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फेरमतमोजणीतून बदलला गेल्याची ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group