पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या म्हणजेच १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. याच वाढदिवसाचे औचित्य साधून दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मोदींच्या वाढदिवसाचे साधून दिल्लीतील ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेशी जोडले जाणार आहे. रविवारी (१४ सप्टेंबर) जाहीर झालेल्या ३ कल्याणकारी योजनांविषयी रेखा गुप्ता यांनी माहिती दिली.
पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी तब्बल १४९ कोटी रुपयांचे बजेट वाटप करण्यात आले असल्याचे रेखा गुप्ता यांनी सांगितले.
नव्या पेन्शन योजनेमुळे ५०,००० जेष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासा मिळेल. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पेन्शन योजनेशी संबंधित घोषणा केली होती. ६० ते ६९ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक मदत २००० रुपयांवरुन २,५०० रुपये करण्यात येत आहे आणि आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना २,५०० रुपयांवरून ३,००० रुपये करण्यात येत आहे असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते.