पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर आहे. मे २०२३ पासून सुरू असलेल्या मैतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारपासून तीन दिवस पाच राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.मणिपूरसह मिझोराम, आसाम, प. बंगाल आणि बिहार या राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.
मणिपूरमधील अशांतता आणि जाळपोळीच्या घटनानंतर प्रथमच मोदी इथे आले त्यामुळे, विकासकामांच्या मुद्द्यासह नेमकं काय बोलतील याकडे देशाचे लक्ष लागले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मणिपूरची भूमी ही धाडस आणि शौर्याची भूमी आहे, मी मणिपूरकरांच्या इच्छाशक्तीला सलाम करतो. मोठ्या पावसातही आपण सर्वजण इथे आलात, असे म्हणत मोदींनी मणिपूरवासीयांचे आभार मानले.
मणिपूरच्या नावातच मणी आहे, हा तो मणी आहे जो आगामी काळात उत्तर पूर्व भारताची चमक वाढवणार आहे. मणिपूर हे बॉर्डरला लागून असलेलं राज्य आहे, येथे दळणवळण नाही. त्यामुळे, तुम्हाला जी अडचण आहे, ती मी जाणतो. २०१४ पासून मी या राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन होतो. शहरांसह गावागावात रस्ते पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील होतो. आता, राज्यात 8768 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम सुरू असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.