नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाने ड्रायव्हरला 33 लाखांचा गंडा घातल्याची घटना आरडी सर्कलजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी चंदन कुवर व फिर्यादी प्रवीण जाधव यांची सन 2018 मध्ये एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी चंदन हा एका कंपनी कामाला होता. त्याला शेअर्स ट्रेडिंगची देखील चांगली माहिती होती. चंदनचे आरडी सर्कल येथे रुद्रा ट्रेडिंग नावाची फर्म आहे.
चंदन कुवरने नंतर प्रवीण जाधव यांना त्याच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामास घेतले. काही काळानंतर प्रवीण श्रीपत जाधव (वय 47, रा. समतानगर, सातपूर) यांना 8 नोव्हेंबर 2023 रोजी भेटून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सांगितले. चंदनवर विश्वास ठेऊन जाधव यांनी गावाकडची जमीन विकली व त्यातून चंदनला 15 लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले.
कुंवरने जाधव यांना आपल्या ऑफिसमध्ये वेळोवेळी बोलावून त्याने गुंतवणूकदारांना 8 ते 10 टक्के परतावा दिल्याचे सांगितले. तसेच तो प्लॉटिंगमध्ये देखील गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. जाधव यांनी पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवून प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 20 लाख रुपये रोख स्वरुपात दिले.
अशा प्रमारे जाधव यांनी चंदनला 8 नोव्हेंबर 2023 पासून आजपर्यंत वेळोवेळी आरटीजीएस व रोख स्वरुपात एकूण 35 लाख रुपये दिले. आतापर्यंत कुवरने त्यांना जानेवारी ते मे 2024 या पाच महिन्यांचे दरमहा 45 हजार रुपयांप्रमाणे 2 लाख 25 हजार रुपये परताव्याच्या स्वरुपात दिले. त्यानंतर त्याने पैसे देणे बंद केले. नंतर अनेक दिवस जाधव यांनी कुवर पैसे देईल या आशेने त्याची वाट पाहिली. कुवर याच्याकडून गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी 32 लाख 75 हजार रुपये जाधव यांना घेणे बाकी होते.
जाधव यांनी वेळोवेळी पैशांची मागणी केली. कुवर त्यांना उडवा उडवीची उत्तरे देत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बागूल करीत आहे.