नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये पाच जण जखमी झाल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
अपघाताचा पहिला प्रकार गंगापूर रोड येथे घडला. फिर्यादी विनय सुरेश शेवाळे (रा. बळवंतनगर, गंगापूर रोड, नाशिक) हे रस्त्याने पायी जात होते. शेळके हे मधुर स्वीट्ससमोर आले असता भरधाव आलेल्या जीजे 06 बीव्ही 8923 या क्रमांकाच्या कारवरील चालक दिनेश साळवी याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विनय शेवाळे यांना पाठीमागून जोराची ठोस मारली. त्यात शेवाळे यांना दुखापत झाली असून, कारचालकाविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ढमाले करीत आहेत.
अपघाताचा दुसरा प्रकार मुंबई नाका येथे घडला. फिर्यादी अनिल श्रीकृष्ण ठाकूर (रा. आर. डी. सर्कल, गोविंदनगर, नाशिक) हे शालिमार येथून कपडे घेऊन घरी जात होते. मेहता पेट्रोल पंपाजवळ रस्ता ओलांडत असताना एमएच 14 एलएक्स 8759 या क्रमांकाच्या बसवरील चालकाने ठाकूर यांच्या डाव्या पायावरून गाडीचे चाक नेल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
अपघाताचा तिसरा प्रकार सिडकोत घडला. फिर्यादी रोहित चंद्रकांत सोनवणे (रा. सद्गुरू अपार्टमेंट, गोविंदनगर, नाशिक) हे मुलगा ध्रुव ऊर्फ रुद्र व सासू शैला आवारे यांच्यासह मोटारसायकलीने जात होते. सिडकोतील भामरे मिसळजवळ आले असता एमएच 15 एफयू 9401 या क्रमांकाच्या रिक्षावरील चालकाने मोटारसायकलीला ठोस मारली. त्यात मोटारसायकलीवरील फिर्यादी सोनवणेसह त्यांचा मुलगा व सासू जखमी झाले आहेत.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.