भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चांदवड-निफाड मार्गावर हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ( दि. २९ जानेवारी ) दुपारी एक वाजेच्या सुमारास चांदवड-निफाड मार्गावरील गणूर ते परसूलदरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. दुचाकी क्र. एम. एच. १५ जी. जी. ७६२४ आणि क्र. एम. एच. १५ के. डी. ३०२४ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली, ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने या अपघातात प्रसाद विनायक शिंदे (वय २२, रा. देवरगाव) आणि गणेश पंडू बरडे (वय २३, रा. आसरखेडे) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
तर संकेत अरुण ठाकरे (वय २१, रा. गणूर), बाळू सखाराम गोधडे (वय २१, रा. गोई, चांदवड आणि अजिंक्य अण्णासाहेब शिंदे (वय २२, रा. देवरगाव) हे तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. संकेत ठाकरे याला पुढील उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे हलवण्यात आले असून, उर्वरित जखमींवर चांदवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.