अमरावती जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई ई-बस आणि प्रवासी ऑटोरिक्षाच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास वरुड-राजुरा बाजार मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, एसटी महामंडळाची एमएच ४९, बीझेड ९४३६ या क्रमांकाची शिवाई बस वरुड बसस्थानकातून वर्ध्याकडे निघाली होती. त्याचवेळी एमएच २७ एआर १८२३ क्रमांकाची ऑटोरिक्षा काही विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन वरुडकडे येत होती. वरुडपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगनजीक भरधाव बसने समोरून येणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक दिली. क्षणार्धात ऑटोरिक्षा रस्त्याच्या कडेला फेकल्या गेली. अपघात इतका भीषण होता की, ऑटोरिक्षातील चौघांचा घटनास्थळीच, तर एकाचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ऑटोचालक कैलाश घनश्याम नागदिवे (४२) रा. वाडेगाव), चिंतामण सदाशिव नागदिवे (६०, रा. वाडेगाव), माही प्रवीण मांगूळकर (१३, रा. वाडेगाव), हरिभाऊ दौलत शिंदे (८३, रा. जरूड) व राजकुमार भलावी (५५, रा. गव्हाणकुंड) अशी मृतांची नावे आहेत. प्रतिभा प्रकाश लाड (१८) आणि मोहिनी वंदे भोरे (१८, रा. राजुरा बाजार) या दोघी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, वरुड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविले. बसचालक निखिल रामभाऊ वरठी (२६, रा. तळेगाव) श्यामजी पंत (आष्टी, जि. वर्धा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. बस भरधाव होती आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.