नाशिकमधील येवल्यात कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व जण शिर्डीला साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी सूरतहून गाडीने निघाले होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी सूरतहून ७ जण फॉर्च्युनर गाडीने निघाले होते. त्यावेळी नाशिकमधील येवला तालुक्यातील एरंडगावमध्ये चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. या कारचा इतका भीषण अपघात झाला की तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांकडून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याशिवाय मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
गुजरातमधील सुरतवरून शिर्डीकडे साई बाबांच्या दर्शनाला येत असताना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगावात रायते शिवारात अपघात झाला. चालकाचे फॉर्च्युनर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दोन-तीन पलट्या मारल्या. या अपघातात गाडीतील दोन जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व पाच जखमींना नाशिक येथे उपचारासाठी नेत होत. त्यावेळी एक जण रस्त्यात मृत पावला तर बाकीच्या चौघांवर नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. पोलिसांकडून या अपघाताचा तपास केला जात आहे.