उमेदवारीच्या ‘गाजरा’वर भाजप निष्ठावंतांचा संताप; नाशिक रोडमध्ये गाजर भेट देत अनोखा निषेध
उमेदवारीच्या ‘गाजरा’वर भाजप निष्ठावंतांचा संताप; नाशिक रोडमध्ये गाजर भेट देत अनोखा निषेध
img
Chandrakant Barve
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीचे गाजर दाखवले; मात्र प्रत्यक्षात अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करत आज नाशिक रोड येथे अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला.  शहराध्यक्ष सुनील केदार व मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांना गाजर भेट देत नाराज कार्यकर्त्यांनी “गाजरीय जनता पार्टीचा निषेध असो” अशा घोषणाबाजी केली.

नाशिक रोड शहरातील सहा प्रभागांमधील २३ जागांसाठी भाजपाकडे तब्बल १८४ इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) यांना दोन जागा देण्याचा शब्द दिला असतानाही तो न पाळल्याने रिपाईचे माजी नगरसेवक संजय भालेराव, अमोल पगारे व समीर शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

राजकारण घाणेरडं... अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजप उमेदवार अन् कुटुंबीय ढसाढसा रडले

दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करताना मनपा कार्यालयात मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. बाहेरून आयात केलेल्या इच्छुकांना उमेदवारी देऊन जुने, निष्ठावंत कार्यकर्ते डावलल्याची खदखद आज शहराध्यक्ष सुनील केदार व मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांच्यासमोर उफाळून आली. यावेळी अनेक महिला इच्छुक उमेदवारांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आजी-माजी आमदार तसेच माजी मंत्री बबनराव घोलप, प्रभाग क्रमांक २० चे उमेदवार संभाजी मोरुसकर आणि प्रभाग क्रमांक १७ चे उमेदवार दिनकर आढाव यांच्यावर तीव्र रोष व्यक्त करत शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या.

शहराध्यक्ष केदार कार्यालयात पोहोचताच मोठा गदारोळ झाल्याने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्यासह पावस फाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. पोलिसांनी शहराध्यक्ष केदार व मंडल अध्यक्ष घंटे यांची घेराव्यातून सुटका केली.

तरीदेखील नाराज भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त करीत होते. अखेर पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून निघालेल्या शहराध्यक्ष सुनील केदार व मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांना नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गाजर भेट दिली. मात्र केदार यांनी गाजर स्वीकारण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडाला.

या आंदोलनात सचिन हांडगे, किरण पगारे, हर्षदा पवार, सीमा डावखर, राकेश जाधव, विकास पगारे, विजय लोखंडे, भावना नारद, महिंद्रा अहिरे, शरद जगताप, योगेश कपिले, ज्योती चव्हाणके, ऋषिकेश डावखर, मंदा फड, निवृत्ती अरिंगळे, नवनाथ ढगे, राजश्री जाधव आदी पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी भाजप नेतृत्वावर तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला.


इतर बातम्या
Join Whatsapp Group