शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 58 लाखांची फसवणूक
शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 58 लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास 15 ते 20 टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी सुमारे 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अज्ञात आरोपींनी संगनमत करून 51 वर्षीय तक्रारदार व इतर तक्रारदारांना व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल व मेसेजद्वारे संपर्क साधला. फॉरेक्स व ट्रेडिंग गुंतवणुकीविषयी माहिती दिली. त्यानंतर एपीके पाठविलेल्या लिंकद्वारे फॉरेक्स मसनजी हा बनावट ट्रेडिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले, तसेच या अ‍ॅपद्वारे फॉरेक्स ट्रेडिंग करीत असल्याचे भासवून नमूद ट्रेडिंगद्वारे महिन्याला 15 ते 20 टक्के नफा होईल, असे आमिष दाखविले, त्याकरिता बँक खात्यांमध्ये एकूण 27 लाख 94 हजार 74 रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली,

तसेच दुसर्‍या तक्रारदारांनासुद्धा वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून अज्ञात आरोपींनी संपर्क साधला. त्यांनाही शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून बनावट प्लॅटफॉर्मद्वारे 29 लाख 88 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केली.

दोन्ही तक्रारदारांची एकूण 57 लाख 82 हजार 74 रुपयांची फसवणुकीची रक्कम वर्ग झालेले बँक खाते, वॉलेट खाते व वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकधारकांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.

Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group