नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून इसमाला जिवे मारण्याचा प्रयत्न
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून इसमाला जिवे मारण्याचा प्रयत्न
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जुन्या भांडणाची कुरापत काढून एका इसमाला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत परिसरात युवकाने धारदार शस्त्राने दहशत माजविल्याची घटना चुंचाळे परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी प्रभू सखाराम कुर्‍हाडे (वय ४०) आणि आरोपी रवी गजानन गवई हे दोघे एकाच इमारतीत घरकुल चुंचाळे योजना अंबड येथे राहतात. फिर्यादी हे १० जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास परिवारासह घरी जात होते. त्यावेळी आरोपी रवी गवई याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून कुर्‍हाडे यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. 

मोठी बातमी ! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या ? निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश

नंतर त्याने कुर्‍हाडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने कुर्‍हाडे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. कुर्‍हाडे यांनी हा वार चुकवून रवीला पाठीमागून पकडत त्याच्या हातातील शस्त्र हिसकावून घेतले. ही झटापट सोडविण्यासाठी कुर्‍हाडे यांच्या पत्नी मध्ये पडल्या असता गवईने कुर्‍हाडे यांच्या पत्नीच्या अंगावर हात टाकत त्यांचा ड्रेस ओढून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. हा तमाशा सुरू असताना आजूबाजूचे लोक वाचविण्यासाठी आले असता “आमच्या भांडणात पडू नका. नाही तर तुमचा काटा काढतो,” अशी धमकी देत रवी गवईने परिसरात दहशत निर्माण केली. रवी गवई हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी कुर्‍हाडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात रवी गवईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप भंडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group