नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून ऑनलाईन ट्रेडिंगच्या बहाण्याने जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदारासह साक्षीदारांना 65 लाख 44 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणार्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी व साक्षीदार यांना अज्ञात व्यक्तीने दोन वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून संपर्क साधून त्यांच्याशी चॅटिंग सुरू केली. फोन करणार्या व्यक्तीने इंटरनेटच्या माध्यमातून शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासविले, तसेच ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी व साक्षीदारांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण 65 लाख 44 हजार 837 रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले; मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही गुंतवणूक केलेली रक्कम आरोपीने परत न करता व नफाही न देता ऑनलाईन फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.