नाशिक महानगरपालिकेच्या कर विभागाने गेल्या वर्षभरात शहरात सुमारे 30 हजार नवीन मिळकतींचा शोध घेतला असून, त्यासाठी नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेणारे व बांधकाम पूर्ण होवून त्याचा वापर करणार्या मिळकतधारकांचा प्रामुख्याने समावेश आहे. या नवीन मिळकतधारकांकडून सुमारे 20 ते 25 कोटी रूपयांचा मिळकत कर मिळण्याची अपेक्षा आहे. या मिळकतधारकांना घरपट्टी व पाणीपट्टी आकारण्यात येत आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या कर विभागाने जाहीर केलेल्या मर्यादित कालावधीसाठीच्या ‘अभय’ योजनेत दोन दिवसांतच सुमारे पाच कोटी रूपयांचा भरणा करण्यात आला आहे. मिळकत करावरील शास्ती व व्याजाच्या रकमेत 95 टक्के सवलत देणार्या या योजनेचा लाभ घेण्याची मुदत 5 मार्चपर्यंत आहे.
यंदा मिळकत कर विभागाला 257 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 230 कोटी रूपये जमा झाले असून, घरपट्टी, पाणी पट्टीतून किमान 300 कोटी रूपये वसूल झाले पाहिजे, अशा आयुक्तांच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने कर विभागाने सुमारे 1200 थकबाकीदार मिळकत-धारकांना वसुलीसाठी ‘वॉरंट’ बजावले आहेत. त्यांच्याकडे मोठी थकबाकी आहे. अशांकडे तगादा लावला जात आहे, तर मिळकत कर भरण्याबाबत विभागनिहाय जागृती केली जात असल्याचे कर विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी सांगितले.
नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी पहिल्याच महासभेत सर्व थकबाकीदार मिळकत-धारकांना त्यांच्या मिळकतीवरील शास्ती व व्याजात 95 टक्के सवलत देण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी 23 फेब्रुवारीपासून करण्यात आल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
दोन दिवसांतच सुमारे पाच कोटी रूपयांचा भरणा करण्यात आला आहे. या सवलत योजनेला अजून आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा केला जात आहे.