एरोबॅटिक शो 2026 : नाशिकच्या आकाशात उद्या सूर्यकिरण विमाने साकारणार तिरंगा, दोन दिवस विमानांचा रंगणार थरार
एरोबॅटिक शो 2026 : नाशिकच्या आकाशात उद्या सूर्यकिरण विमाने साकारणार तिरंगा, दोन दिवस विमानांचा रंगणार थरार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भमर प्रतिनिधी) :- भारतीय वायू दल व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर धरण परिसरात 22 व 23 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत भव्य एरोबॅटिक शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोदरम्यान भारतीय वायू दलाची ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीम आपल्या लढाऊ विमानांद्वारे नाशिकच्या आकाशात तिरंगा साकारणार आहे.

या एरोबॅटिक शोची तयारी अंतिम टप्प्यात असून नाशिकची सून असलेल्या फ्लाईट लेफ्टनंट व सूर्यकिरण टीमच्या जनसंपर्क अधिकारी कवल संधू या संपूर्ण शोचे धावते वर्णन करणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भारतीय वायू दलाचे स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल, स्क्वॉड्रन लीडर संदीप दयाळ, फ्लाईट लेफ्टनंट कवल संधू, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत तसेच सदर्न कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची स्थापना 1996 मध्ये झाली असून आतापर्यंत देश-विदेशात 750 हून अधिक एरोबॅटिक शोमध्ये या टीमने सहभाग घेतला आहे. आशिया खंडातील ही एक सर्वोत्तम एरोबॅटिक टीम मानली जाते.

या टीममध्ये लढाऊ वैमानिक, अभियंते व कुशल तंत्रज्ञांसह सुमारे 150 सदस्यांचा समावेश आहे. या शोसाठी हॉक एमके-132 या स्वदेशी प्रशिक्षणार्थी विमानांचा वापर करण्यात येणार आहे. ही विमाने 2015 मध्ये वायू दलात दाखल झाली असून एरोबॅटिक प्रात्यक्षिकांदरम्यान केशरी, पांढरा व हिरवा असा तिरंग्याचा रंग आकाशात उधळताना पाहायला मिळणार आहे.यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा नाशिक येथेच करण्यात आल्या आहेत.

सूर्यकिरण टीममध्ये स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल यांच्यासह ग्रुप कॅप्टन अजय दशरथी, डेप्युटी लीडर ग्रुप कॅप्टन सिद्धेश कार्तिक, स्क्वॉड्रन लीडर जसदीप सिंह, संजेश सिंह, राहुल सिंह, अंकित वसिष्ठ, दिवाकर शर्मा, एडवर्ड प्रिन्स, ललित वर्मा, विंग कमांडर राजेश काजला, विंग कमांडर तेजेश्‍वर सिंह यांचा समावेश आहे. तांत्रिक पथकात विंग कमांडर अभिमन्यू त्यागी, स्क्वॉड्रन लीडर संदीप दयाळ व फ्लाईट लेफ्टनंट मनील शर्मा यांचा समावेश आहे.
एरोबॅटिक प्रात्यक्षिकांच्या वेळी विमानांमध्ये किमान पाच मीटर अंतर ठेवले जाणार असून सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात आल्या आहेत. सूर्यकिरण टीमची विमाने आज नाशिकमध्ये दाखल झाली.

फ्लाईट लेफ्टनंट कवल संधू यांचे सासर नाशिकमध्ये असून त्या या एरोबॅटिक शोचे संपूर्ण धावते वर्णन करणार आहेत. नाशिककर नागरिकांनी या भव्य आणि थरारक एरोबॅटिक शोचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

एरोबॅटिक शोमुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील तरुणांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत होईल. तसेच नाशिकच्या पर्यटनालाही चालना मिळेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय वायू दलाच्या थरारक कसरती प्रत्यक्ष अनुभवाव्यात.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

‘सदैव सर्वोत्तम’ हे सूर्यकिरण टीमचे बोधवाक्य असून त्यानुसार 22 व 23 जानेवारी 2026 रोजी गंगापूर धरण परिसरात सर्वोत्तम दर्जाचा एरोबॅटिक शो सादर करण्यात येईल.  
- कवल संधू,
फ्लाईट लेफ्टनंट व जनसंपर्क अधिकारी, सूर्यकिरण टीम
इतर बातम्या
Join Whatsapp Group