नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर जुन्या जन्मनोंदी ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान नाशिकमधील सुमारे 18 हजार बोगस नोंदी घुसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बोगस नोंदींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
महाराष्ट्रात अवैधरित्या वास्तव्य करणार्या बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना देशातून हद्दपार करण्याच्या उद्देशाने सोमय्या 25 महापालिकांना भेट देत आहेत. त्याच अनुषंगाने काल त्यांनी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची त्यांच्या दालनात अधिकार्यांसमवेत भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नावर भूमिका मांडली. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, भाजप गटनेते अॅड. श्याम बडोदे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी तसेच मनपातील अधिकारी उपस्थित होते.
अवैधरित्या राहणारा कोणताही बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अफगाणी नागरिक येथे राहू शकणार नाही. अशा व्यक्तींनी भारतात जन्म झाल्याचा पुरावा सादर करावा, अशी सरकारची भूमिका असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार येण्यापूर्वी मतपेढीच्या राजकारणासाठी अशा घुसखोरांना आश्रय देण्यात आला. मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक घुसखोरांना देशाबाहेर पाठविण्यात आले, असा दावा त्यांनी केला. पुढील महिनाभरात 25 महापालिकांना भेट देऊन अशा प्रकरणांची माहिती घेण्यात येणार असून, बोगस जन्म प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
मालेगावी 1,043 गुन्हे दाखल- सोमय्या म्हणाले की, मालेगाव येथे कारवाईनंतर 3,977 जणांची जन्मनोंद प्रमाणपत्रे प्रशासनाने रद्द केली. त्यापैकी 1,043 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना आरोपी करण्यात आले आहे. या 3,977 जणांपैकी एकालाही पुन्हा जन्म प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.