नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : बिल्डिंगच्या टेरेसवर गल्लीतील मुलांना घेऊन पतंग उडवीत असताना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकास दोघा भावांनी चाकूचे वार करून दुखापत केल्याची घटना गंगापूर शिवारात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नरेंद्र सुधाकर जाधव (रा. शिवाजी पार्क अपार्टमेंट, शिवाजीनगर, सातपूर) हे घरी असताना त्यांच्या बिल्डिंगमधील आरोपी रोहन नितीन पाटील (वय 25) हा बिल्डिंगच्या टेरेसवर गल्लीमधील मुलांना घेऊन पतंग उडवून जोरजोरात भोंगा वाजवीत होता. म्हणून फिर्यादी हे त्याला समजावून सांगण्यासाठी गेले असता त्याचा त्याला राग आला.
त्यानंतर फिर्यादी हे कामावर जाण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आले असता आरोपी रोहन पाटील याने त्याचा भाऊ प्रेम पाटील याला फोन करून बोलावून घेतले. या पाटील बंधूंनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ केली, तसेच आरोपी रोहन पाटील याने त्याच्याकडील धारदार चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर मारून दुखापत केली व तुझ्याकडे पाहून घेतो, असा दम दिला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.