राज्यात महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठीदेखील आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.दरम्यान शहरातील काही मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागली.
नाशिकमधील प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूल, खोली क्रमांक ८ येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदान केंद्रावर सकाळी बराच वेळ मतदान सुरू होऊ शकले नाही. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब लागला. तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून संबंधित मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
तसेच, नाशिकच्या प्रभाग क्रमांक २९ मधील एका मतदान केंद्रात खोली क्रमांक २ मध्ये असलेले ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. तब्बल अर्धा तास मशीन सुरू न झाल्याने मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. सकाळी लवकर मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्रावरच थांबावे लागल्याने काही काळ नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दूर केला आणि मशीन पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर मतदारांनी मतदानास सुरुवात झाली.