नाशिक महापौर पदाचा चेहरा उद्या होणार स्पष्ट, भाजपा समोर शिंदे सेना उबाठाचे आवाहन
नाशिक महापौर पदाचा चेहरा उद्या होणार स्पष्ट, भाजपा समोर शिंदे सेना उबाठाचे आवाहन
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - नाशिक महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची उद्या निवड होणार आहे. या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या शिंदे शिवसेना पक्षाची काय भूमिका होते, यावर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे अवलंबून आहे. 

राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 जागांपैकी 72 जागा जिंकून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यानंतर शिवसेना शिंदे यांच्या पक्षाच्या 26 नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 15 आणि राकपा अजित पवार पक्ष 4, काँग्रेसच्या तीन, मनसे एक, अपक्ष एक अशा पद्धतीप्रमाणे महानगरपालिकेमध्ये पक्षीय बलाबल आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवडणूक होणार असून त्यानंतर पुढील उपमहापौर व अन्य सगळी प्रक्रिया ही नव्याने निवडून आलेले महापौर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपचाच महापौर होणार हे निश्चित असतानाच भाजपाने नासिक मध्ये गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविल्यानंतर पुढील भूमिका निश्चित करताना महाजनांनी राजकीय कुबड्या घेतल्या जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी संयुक्तरीत्या निवडणूक लढवल्यानंतर देखील सत्तेमध्ये महापालिकेत सहभागी होता येणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला बिनविरोध न करता निवडणुकीची प्रक्रिया करण्यासाठी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

भाजपाचे महानगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमत असल्याने भाजपच्या वतीने हिमगौरी आहेर आडके यांना महापौर पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने उपमहापौर पदासाठी विलास शिंदे, प्रवीण तिदमे, राहुल दिवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर शिवसेना उबाठाच्या वतीने महापौर पदासाठी सीमा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

सभागृहातच उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया होणार असल्याने आता सत्तेमध्ये सहभागी झालेल्या शिवसेना शिंदे पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलेले आहे. भाजपने अजून पर्यंत या दोन्हीही पक्षांशी चर्चा केली नसली तरी प्रत्यक्षात उद्या यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होऊ शकतो आणि शिवसेना शिंदे पक्षाला उपमहापौर पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाबत काय भूमिका घेतली जाते हे देखील यावेळी निश्चित होणार आहे. त्यामुळे अजूनही भाजपला स्पष्ट बहुमत असलं तरी देखील नाशिकमध्ये सत्तेसाठी निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 
भाजपाचे नगरसेवक आज सकाळी भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथून अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. यावेळी शहर अध्यक्ष सुनील केदार, सुनील देसाई, नाना शिलेदार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब आहेर, गोविंद बोरसे,  यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. अज्ञात स्थळी भाजपाचे 72 नगरसेवक हे गेल्यानंतर थेट उद्या सकाळी दहा वाजता सभागृहातच हजर होणार आहे असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. 

उपमहापौर पदासाठी शिंदेसेनेत रस्सीखेच
उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे पक्षातच जोरदार रस्सीखेच सुरू असून या सर्व प्रकरणी पक्षाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी पक्षाला एक अहवाल पाठवलेला आहे. उपमहापौर पदासाठी पक्षाच्यावतीने विलास शिंदे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते, मात्र महानगर प्रमुख बंटी तिदमे आणि राहुल दिवे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. त्यामुळे उपमहापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे देखील महत्त्वाचे आहे. या सर्व प्रश्नांवर बोलताना उपमहापौर पदाचे प्रमुख दावेदार असलेले विलास शिंदे यांनी सांगितले की, गटनेत्यांनी जी सूचना दिली त्यानुसार मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बाकीच्या अर्जांवर पक्ष योग्य तो निर्णय घेईल. दरम्यान या सर्व प्रकरणावर पक्षाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी पक्षाला एक अहवाल सादर केला असून पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

निवडणुकीची रंगीत तालीम पक्षाचे नगरसेवक ज्या ठिकाणी अज्ञात स्थळी गेले आहे त्या ठिकाणी घेतली जाणार आहे . सर्व नगरसेवक एक संघ आहे त्यांच्यामध्ये कोणतेही वाद नाही त्यांची ओळख व्हावी त्यांना ज्या ठिकाणी निवडणुकीची रंगीत तालीम घेतली जाणार असून त्यांना तसे पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group