नाशिक (प्रतिनिधी) :- दहा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच घेताना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हवलदाराला लाच रुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
संदीप दगू गांगुर्डे असे लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आरोपी पोलीस हवालदार संदीप दगू गांगुर्डे हे करत आहेत.
या गुन्ह्यात यातील फिर्यादी यांना सेटलमेंट करून मदत करण्यासाठी संदीप गांगुर्डे यांनी दिनांक 31/01/2026 रोजी फिर्यादी यांच्याकडे 10,000 रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना गांगुर्डे यास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 2/2/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग ,मुंबई येथे तक्रारी अर्ज दिला होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 3/2/2026 रोजी पडताळणी कार्यवाही केली असता गांगुर्डे यांनी तक्रारदार यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5,000 लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले व त्यानुसार आज तत्काळ पंचांसमक्ष सापळा कारवाई आयोजित केली.
सापळा कारवाई दरम्यान संदीप गांगुर्डे यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या बाहेरील गेटवर पंचांसमक्ष लाच रक्कम स्वीकारली. गांगुर्डे यास संशय आल्याने तो जलद गतीने पोलीस स्टेशन आवारातील बाथरूम मध्ये गेला. त्याचा पाठलाग करून रंगेहात ताब्यात घेतल्यानंतर त्यास लाच रक्कम बाबत विचारणा केल्यावर त्यांनी उपयुक्त माहिती दिली नाही.
अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या वापरत्या मोटार सायकलच्या डिकी मध्ये लपवून ठेवलेली लाच रक्कम दाखवली ती ताब्यात घेतली.
गांगुर्डे यांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गांगुर्डे यांच्या नाशिक येथील घराची घर झडती सुरू असून अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.