नाशिक : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग
नाशिक : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग
img
वैष्णवी सांगळे
सिन्नर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी माळेगाव एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

माहितीनुसार, “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीमध्ये अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारी पावडर तयार केली जाते. ही पावडर विविध केमिकल्सपासून तयार केली जात असल्याने कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचे ड्रम साठवलेले होते. याच केमिकलच्या ड्रमला आग लागल्याने काही क्षणातच आग संपूर्ण युनिटमध्ये पसरली आणि कंपनीतील साहित्य व यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, या केमिकल ड्रमवर पाणी मारल्यास आग अधिक भडकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक महानगरपालिका अग्निशमन दल देखील काही वेळात घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

आगीची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असून सिन्नर परिसरातील वॉटर टँकर धारकांना घटनास्थळी तातडीने पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी पोलिस व प्रशासनही दाखल झाले असून संपूर्ण परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group