नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा गोदा महोत्सव 2026 नाशिक शहरात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय उपक्रमात विभागीय मिनी ‘सरस’ महोत्सवाचेही उद्यापासून आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव दि. 5 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत गंगापूर रोडवरील येथील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी जिल्ह्यासह विभागातील विविध महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने नागरिकांना पाहता व खरेदी करता येणार आहेत.
या ‘सरस’ प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यासह नाशिक विभागातील एकूण 175 स्टॉल्सचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये 140 वस्तू विक्रीचे व 35 पारंपरिक जेवणाचे स्टॉल्स असणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांसह ग्रामीण संस्कृतीची अस्सल चव अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे.
महोत्सवात महिलांनी तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला व हस्तव्यवसायावर आधारित उत्पादने तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. यामुळे महिलांच्या उद्योगांना थेट प्रोत्साहन मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः महिलांच्या स्वावलंबनासाठी व त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
गोदा महोत्सव 2026 हा केवळ खरेदी-विक्रीपुरता मर्यादित न राहता महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव ठरणार आहे. कुटुंबीय व मित्रपरिवारासह या महोत्सवाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांचा आस्वाद घ्यावा तसेच महिला स्वयंसहायता समूहांच्या कार्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी नागरिकांना महोत्सवाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी डोंगरे वसतिगृह येथे कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांनी कष्टातून व कौशल्यातून निर्माण केलेली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन महिला उद्योजिकांना नाशिककरांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.