नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सायबर भामट्यांकडून फसवणूक झालेल्या इसमास पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी 15 लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिसांनी मध्य प्रदेशातील तिघांना कलिंगुट, गोवा येथून अटक केली आहे. तसेच ग्राहकांनी अनोळखी लिंकवर प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी, की सांगवी (ता. देवळा) येथील तक्रारदारास मारवाडी फायनान्स ब्रोकर या अनोळखी लिंकवरून फोन करून शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी 32 लाख 5 हजार 900 रुपये संबंधितांनी सांगितलेल्या खात्यात भरले. त्यानंतर आपल्या खात्यावर व्हर्च्युअल पोर्टलमध्ये एकूण 83 लाख 39 हजार 700 रुपये वाढ झाल्याचे तक्रारदाराला दिसून आले. त्यामुळे तक्रारदाराने पैसे काढण्याचा निर्णय घेऊन संबंधित भामट्यांना सांगितले.
त्यावर भामट्यांनी प्रॉफिट रकमेच्या 20 टक्के रक्कम इन्कम टॅक्ससाठी आमच्याकडे जमा करा, तरच ही रक्कम काढता येईल, असे सांगितले. यामुळे तक्रारदाराला संशय येऊन त्यांनी आपले खाते असलेल्या स्टेट बँक शाखेत चौकशी केली.यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस शाखेत भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 319 (2), 3 व अन्य कलमांन्वये तक्रार नोंदविली.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव, कॉन्स्टेबल सोहेल मुलाणी, राहुल भोर, महिला पोलीस कॉन्स्टेबल दीक्षा मोरे, हवालदार हेमंत गिलबिले, हवालदार प्रदीप बहिरम यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून या गुन्ह्यातील भामटे उज्ज्वल धर्मेंद्र बिरथरे व अमन राजेंद्र शर्मा (दोघेही रा. इमली रोड, मानपूर, ता. महू, जि. इंदूर, मध्य प्रदेश) यांच्यासह चेतन दिलीप राठोड (रा. लोणीपुरा, जि. इंदूर, मध्य प्रदेश) या तिघांना कलिंगुट (गोवा) येथून अटक केली. त्यांच्याकडून 15 लाख रुपये परत मिळवून तक्रारदारास परत करण्यात आले आहेत.
सायबर पोलिसांचे आवाहन
मोबाईल फोन वा व्हॉट्सअॅपवर कोणताही अनोळखी मेसेस वा फोन आल्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करतानाच सायबर पोलिसांनी तक्रारदाराची फसवणूक करणार्या बनावट लिंकची माहिती दिली आहे. त्यात मारवाडी फायनान्स ब्रोकर यांच्या http://marwadifinancebroker.com/online-trading.html व htttp:// marwadifinancebroker. com/call-and-trade.html यांचा समावेश आहे.
कोणतीही बँक फोनवर अशी माहिती विचारत नाही. तेव्हा फसवणूक झाल्यास ऑनलाईन तक्रारीसाठी 1930, 1945 आणि सायबर पोलीस ठाणे 0253-2200408 व 7666312112 यावर संपर्क करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.