नाशिक : शिक्षकी पेशाला काळिमा ! ९ वर्षीय विद्यार्थीनीवर ५५ वर्षीय शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
नाशिक : शिक्षकी पेशाला काळिमा ! ९ वर्षीय विद्यार्थीनीवर ५५ वर्षीय शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
img
वैष्णवी सांगळे
इगतपुरी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका ५५ वर्षीय शिक्षकाने ९ वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या करंजवाडी (अडसरे बु) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीला चॉकलेटचे आमिष दाखवून शिक्षकाने तब्बल सात ते आठ महिने लैगिंक अत्याचार केलाय. 

शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्यांचं भविष्य, सुरक्षितता आणि संस्कार असतात मात्र याच शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना याठिकाणी घडली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी जोर धरू लागली आहे.

रामचंद्र मनाजी कचरे (वय ५५) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. चॉकलेटचे आमिष, भीती आणि दमदाटीचा वापर करून कचरे याने मुलीच्या बालपणावरच घाला घालण्यात आल्याचा आरोप आहे.पीडित मुलीच्या सांगण्यावरून तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर घोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील सदर विद्यार्थिनीला देण्यात आली होती, असे फिर्यादीत सांगण्यात आले आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली.

विशेष म्हणजे यापूर्वीही इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एका मुख्याध्यापकाने अशाच प्रकारचे निंदनीय कृत्य केले होते. ते प्रकरणाची जखम अजून ताजी असतानाच आता पुन्हा एका लहान मुलीवर शाळेतच अत्याचार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे व तुषार ढगे तपास करीत असून, संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी नराधम शिक्षकाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group