नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- “पुढे खून झाला आहे. अंगावरचे दागिने काढून सुरक्षित ठेवा,” असे आवाहन करून पोलिसांच्या वेशात रस्त्याने जाणार्या नागरिक व महिलांच्या दागिन्यांची शिताफीने अदलाबदल करून फरारी होणार्या जाफर मालिक सय्यद ऊर्फ संजू इराणी (वय 53, रा. मंगलनगर, अटाळीगाव, ता. कल्याण, जि. ठाणे) या सराईत चोरट्यास नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने आंबिवली येथे जाऊन अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 18 लाख रुपये किमतीचे 123 ग्रॅम वजनाचे सोने व सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. त्याच्याकडून नाशिकमधील दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.
याबाबत माहिती अशी, की गेल्या दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास दीपनगर, शिवाजीनगर, नाशिक येथे जुलेखा नजिर शेख (वय 74) ही महिला घरी जात असता अज्ञात इसमांनी स्वत: पोलीस असल्याची बतावणी करून 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली होती. यासह नाशिकमध्ये तोतया पोलिसांनी फसवणूक केल्याच्या अनेक घटना वाढू लागल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अशा घटनांचा तपास करून आरोपी उघडकीस आणावेत, असे आदेश नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दिले होते. अशाच घटना इंदिरानगर, उपनगर व इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्येही घडल्या होत्या. त्यामुळे नाशिकरोड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार मंगेश जगझाप, दत्तात्रय चकोर व कॉन्स्टेबल भरत राऊत यांनी संशयित आरोपींच्या येण्याजाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून आरोपीचा फोटो मिळाला.
हा फोटो पोलिसांना गुप्त खबरी पुरविणार्या काही बातमीदारांना दाखविला असता हा आरोपी आंबिवली (जि. ठाणे) येथील कुप्रसिद्ध इराणी टोळीचा सदस्य असल्याचे समजले. आंबिवलीचा संपूर्ण परिसर हा गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तपास करताना पोलिसांनी अत्यंत सावधानता बाळगली होती. त्यात संजीव इराणी हा पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान आंबिवली स्टेशनजवळ चहा पिण्यासाठी येतो, अशी खबर मिळाल्यामुळे नाशिकच्या पोलीस पथकातील उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर व मंगेश जगताप यांनी पहाटेच्या अंधारातच आरोपीला गाठले. आंबिवली परिसर हा गुन्हेगारांचा अड्डाम्हणून कुप्रसिद्ध असल्याने आरोपीच्या साथीदारांनी विरोध करू नये, म्हणून त्यास खासगी वाहनातून नाशिकमध्ये आणले.
संजू इराणीने अधिक चौकशीत दीपनगर, शिवाजीनगर येथील वृद्ध महिलेची सोन्याची चेन तोतया पोलीस बनून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच संजू इराणीने उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील तीन व इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाच अशा दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
चोरलेले काही दागिने अहमदाबाद येथे विक्री केल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार देवरे, चकोर, जगझाप यांनी माणेक चौक, अहमदाबाद येथे जाऊन काही दागिने हस्तगत केले, तसेच काही दागिने आंबिवली येथे लपवून ठेवले होते. तेही हस्तगत करण्यात आले. याप्रमाणे 18 लाख रुपये किमतीचे 123 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ अधिकार्यांनी नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई, महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप व कॉन्स्टेबल भरत राऊत यांचे अभिनंदन केले आहे.