नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेकडील दागिने कागदात गुंडाळून ठेवण्याचा बहाणा करून तोतया पोलिसांनी सोन्याची पोत व अंगठी फसवणूक करून चोरून नेल्याची घटना समर्थनगर येथे घडली.
फिर्यादी सुमती बालकृष्ण वारे (वय 75, रा. देवर्षी बंगला, सराफनगर, इंदिरानगर) या मंदिरात दर्शनासाठी पायी जात होत्या. त्यावेळी एक अज्ञात इसम त्यांना म्हणाला, की मावशी, तिकडे आमचे पोलीस इन्स्पेक्टर साहेब उभे आहेत. तुम्ही तिकडे चला. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी या त्या इसमासोबत गेल्या.
मोटारसायकलीजवळ उभ्या असलेल्या दुसर्या इसमाजवळ फिर्यादी आल्या असता तो म्हणाला, की पुढे एका महिलेच्या छातीमध्ये चाकू मारलेला आहे. त्यामुळे तुम्ही असे सोने घालून फिरू नका. ते काढून ठेवा, अशी बतावणी केली. त्यानंतर फिर्यादी महिलेने त्यांच्या गळ्यातील 78 हजार रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व 12 हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढण्यास सांगून कागदात गुंडाळून देतो, असे सांगितले.
फिर्यादी महिलेने घरी गेल्यानंतर ती पुडी उघडून पाहिली असता त्यात मातीचा खडा असल्याचे लक्षात आले. यावरून तोतया पोलिसांनी आपली फसवणूक केल्याची बाब लक्षात आल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोन तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक आव्हाड करीत आहेत.