नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेच्या एका माजी महापौरांचा फोटो मॉर्फ करून त्याखाली आक्षेपार्ह मजकूर टाकून व्हॉट्सअॅपवर पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विनायक किशोर पांडे (रा. कागदी बिल्डिंग, गाडगे महाराज पुतळ्याजवळ, नाशिक) हे माजी महापौर असून, काल (दि. 6) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ते घरी होते. त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते संदेश फुले यांनी फिर्यादीस सांगितले, की भद्रकाली व्यापारी व रहिवासी संघटना नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये असलेले आरोपी श्रीकांत वावरे यांनी एक पोस्ट त्यांच्या मोबाईल क्रमांकावर टाकली आहे. त्यात फिर्यादी पांडे यांचा मॉर्फ केलेला फोटो असलेला एक व्हिडिओ टाकलेला असून, त्यामध्ये ओळखा पाहू मी कोण, असा आक्षेपार्ह मजकूर टाकून व्हिडिओ प्रसारित केल्याचे फिर्यादी पांडे यांना दिसून आले.
या पोस्टमुळे बदनामी झाल्याची फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपी श्रीकांत वावरे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शरमाळे करीत आहेत.