नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहर परिसरात तोतया पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांकडील सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास करून फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
फसवणुकीचा पहिला प्रकार पेठ रोड येथे घडला. फिर्यादी मंदा वसंत वाघ (रा. फुलेनगर, पेठ रोड) या नेहमीप्रमाणे हरिओम्नगर येथील शालेय पोषण आहाराचे काम करून घराकडे पायी जात होत्या. त्या पेठ रोडवरील पाटाच्या अलीकडे रस्त्याने जात असताना तीन अनोळखी पुरुष त्यांच्याजवळ आले व म्हणाले, की रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या साहेबांनी तुम्हाला बोलावले आहे. आम्ही पोलीस आहोत. एका बाईच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची सोन्याची पोत काढून घेतली आहे व पुढे रस्त्यावर पोलिसांकडून चेकिंग चालू आहे, असे सांगून पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर या तीनही तोतया पोलिसांनी संगनमत करून मंदा वाघ यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हातचलाखीने काढली व कागदी पुडीत दगड ठेवून गुंडाळून ती फिर्यादीच्या हातात देऊन सोन्याची पोत हातोहात लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.
फसवणुकीचा दुसरा प्रकार नाशिकरोड येथे घडला. फिर्यादी जागृती अविनाश टिळे (रा. ऋषीप्रसाद बंगला, टागोरनगर, नाशिक) या काल (दि. 19) राहत्या घराजवळील सिद्धार्थनगर येथे लॉज ज्वेलर्सजवळ उभ्या होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ येऊन थांबले. “आम्ही पोलीस आहोत,” असे सांगून त्यांनी फिर्यादी महिलेच्या हातातील 30 हजार रुपये किमतीच्या सहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व पर्समधील दहा हजार रुपयांची रोख रक्कम हातचलाखीने काढून घेत फसवणूक करून गेले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.