नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करिता केलेल्या गुंतवणुकीवरील नफ्याचे सुमारे दीड कोटी रुपये देऊनही पुन्हा 80 लाख रुपयांची खंडणी मागून ती दिली नाही म्हणून एका शेअर्स ब्रोकरची कार बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी तेजस सुरेश चांदवडकर (रा. शिवशक्ती रो हाऊस ध्रुवनगर, गंगापूर रोड) हे शेअर मार्केट ट्रेडिंगचे काम करतात. आरोपी चेतन अशोक देशमुख (रा. शनिमंदिराजवळ, ध्रुवनगर) याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करिता फिर्यादी चांदवडकर यांना 1 कोटी 10 लाख रुपये दिले होते. त्यावर फिर्यादी चांदवडकर यांनी मिळालेल्या नफ्यासह 1 कोटी 41 लाख 30 हजार रुपये देशमुख याला परत केले होते. असे असताना देखील आरोपीने चांदवडकर यांच्याकडे अतिरिक्त 80 लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादी यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला असा आरोपीने फिर्यादी यांना त्यांच्या किडण्या काढून विकण्याची धमकी दिली. तसेच चांदवडकर यांना शिवीगाळ करत धमकावून चांदवडकर यांच्या मालकीची एम.एच.15 जे.एक्स. 3560 या क्रमांकाची महिंद्रा थार नावाची कार बळजबरीने हिसकावून घेवून गेला. तसेच 18 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास फिर्यादीचे वडील सुरेश राजाराम चांदवडकर यांना बिटको कॉलेजजवळील इंडियन ओव्हरसिज बँक येथून बळजबरीने कारमध्ये बसवून छत्रपती संभाजीनगर रोडने घेऊन जात त्यांना 80 लाख रुपये देण्याकरीता धमकावले.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चेतन देशमुखविरुद्ध खंडणीसह अपहरण, धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे करीत आहे.