राज्यात लुटेरी दुल्हन टोळी ऍक्टिव्ह आहे , त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या तरुणांनो घाई करू नका. जरा जपूनच. यापूर्वीही लग्नाची स्वप्न दाखवून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे मुलगी बघताना जरा सावधगिरीनेच पाऊल उचला. कारण नाशिक जिल्हातील एका तरुणाची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शेतकरी अविनाश कवडे यांचे लग्न जुळवण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधण्यात आला होता. मध्यस्थामार्फत घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन गौतम पाटील हिचा प्रस्ताव पुढे आला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगत विवाहाचा खर्च मुलाकडच्यांनी उचलावा, अशी अट सुरुवातीलाच मांडण्यात आली.
ठरल्याप्रमाणे कवडे १० फेब्रुवारी २०२६ रोजी चोरंबा येथे पोहोचले. प्रत्यक्ष भेटीत लग्न निश्चित होण्याआधीच मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. सुरुवातीला नकार दिल्यानंतरही दबाव वाढवून अखेर कवडे यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. यातील दोन लाख रुपये चोरंबा येथीलच एका साथीदाराकडे, तर उर्वरित रक्कम मध्यस्थाकडे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पैसे मिळताच ‘पोहे आणायला जातो’ असा बहाणा करत सिमरन, तिची आई व भाऊ स्कुटीवरून निघून गेले. त्याचवेळी इतर दोघे साथीदारही वेळ साधून तेथून निसटले. काही वेळातच सर्वांचे मोबाईल बंद झाले. बराच वेळ वाट पाहूनही कोणीच न परतल्याने कवडे यांना फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच ठाणेदार केशव ठाकरे यांनी तपासाची चक्रे फिरवत सिमरन गौतम पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील रा.चोरंबा ता.घाटंजी तसेच सहकारी सुनील राठोड व माणिक पवार रा. नंदपूर मोहा (ता. पुसद) यांना अटक केली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून दुचाकी हिसकावून नेल्याच्या घटनेत ती व तिचा भाऊ आरोपी होते. या अपमानानंतर संबंधित शेतकऱ्याने १४ जून २०२५ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्या आत्महत्या प्रकरणातही घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सिमरन नुकतीच कारागृहातून बाहेर आली होती. या टोळीने महाराष्ट्रासह इतरही राज्यात कोणाची फसवणूक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.