उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करणारा कर्मचारी चक्क करोडपती निघाला आहे. या शिपायाने ५३ बँक खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी शिपायाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. बँकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. जिल्हा विद्यालय निरीक्षक कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या इल्हाम उर्र रहमान शम्सी याच्यावर सरकारी तिजोरीतून पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत ५३ खात्यांमधील ५ कोटींहून अधिक रक्कम गोठवण्यात आली आहे. इल्हामने सॅलरी फंडमधून चुकीचे लाभार्थी तयार करून १२ नोव्हेंबर २०२४ पासून ९८ व्यवहार केले. यात त्याने १ कोटी १ लाख ९५ हजार १३५ रुपये थेट आपल्या पत्नीच्या खात्यात जमा केले.
इल्हामने आपली पत्नी अर्शी खातून हिला कागदोपत्री शिक्षिका दाखवून तिच्या खात्यात सरकारी पगार जमा करण्यास सुरुवात केली होती. पोलीस तपासात त्याच्या तीन बायका असल्याचं समोर आलं. बँक स्टेटमेंटची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या एका पत्नीला ताब्यात घेऊन जेलमध्ये पाठवलं आहे. या घोटाळ्यात इल्हामला आणखी कोणी मदत केली का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत ५ कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा समोर आला आहे. सरकारी खात्यातून अनेक बिल्डरांच्या नावेही रकमा वळवण्यात आल्या आहेत, त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.