दैनिक भ्रमर : उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडील आणि पती कामावर गेल्यानंतर महिलेने धक्कादायक कृत्य केले आहे. ही घटना रायबरेली जिल्ह्यातील गुरबख्शगंज पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. इथे एका महिलेने आपल्या मैत्रिणींसोबत मिळून स्वतःच्याच घरातून लाखो रुपयांचे दागिने चोरले.
नेमके प्रकरण काय ?
रायबरेली जिल्ह्यातील गुरबख्शगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका घरातून तिजोरीतील लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. या कुटुंबाचे प्रमुख गुड्डू आपल्या पत्नी आणि मुलगी-जावयासोबत हरियाणाला मजुरीसाठी गेले होते. घर सोडण्यापूर्वी त्यांनी सर्व मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवले होते. यादरम्यान त्यांची मुलगी सोनाली आणि जावई अधूनमधून घरी येत-जात होते. सुमारे दोन महिन्यांनंतर जेव्हा गुड्डू परतले, तेव्हा त्यांना दिसलं की तिजोरीतून सर्व दागिने गायब आहेत. तणावात असलेल्या कुटुंबाने यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांची तपासाची चक्रे फिरवली आणि चौकशीदरम्यान सोनालीने आपल्या आईसमोर संपूर्ण सत्य कबूल केलं. तिने तिच्या मैत्रिणींसोबत मिळून हे काम केलं. आपली मुलगीच चोर असल्याचं समजताच कुटूंबाच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी सोनाली आणि तिच्या तीन मैत्रिणी - मुस्कान, सुमन आणि हिमांशी यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केलेले दागिने कोणत्या ज्वेलर्सना विकले, हे सांगितलं. पोलिसांनी त्या दुकानांतून दागिने परत मिळवले आहेत. तसेच सोनालीसह तिच्या मैत्रिणींनाही ताब्यात घेतलं आहे.