उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजपचे माजी ब्लॉक प्रमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विनोद चौधरी असे मृत भाजपचे माजी ब्लॉक प्रमुखाचे नाव आहे. ते खुर्जा कोतवाली नगर परिसरातील हमीदपूर कला येथील रहिवासी होते. विनोद चौधरी हे जेवर आणि खुर्जाचे माजी ब्लॉक प्रमुख होते.
सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळला. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नेत्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. जुन्या वैमनस्यातून किंवा राजकारणातून त्यांची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा कुणासोबत तरी पैशांवरून वाद सुरू होता. त्या व्यक्तीनं विनोदला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी विनोद चौधरी आणि त्यांचा भाऊ पोलीस ठाण्यातही गेले होते. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.