बीड जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. केज तालुक्यातील पिंपळनेर येथे अल्पवयीन महिलेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात पोलिसांकडून कारवाईला वेग देण्यात आला आहे.
पिंपळनेर येथे विवाहितेवर अत्याचार करून तिला गावच्या चावडीत खांबाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला . या अमानवीय घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून पिंपळनेर पोलिसांनी मुख्य आरोपी वैभव पटेकर याला अटक केली आहे. पीडित महिला पतीसोबत घरात झोपलेली असताना ११ मार्च रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास आरोपीने तिचे अपहरण केले. त्याने महिलेला गावाबाहेर नदीकाठी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला चावडीवर आणून खांबाला बांधून ठेवले. सकाळी ग्रामस्थांनी पीडितेची सुटका केल्यानंतर या प्रकरणाची वाच्यता झाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पिंपळनेर पोलीस आणि पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे या अघोरी कृत्याचा सखोल तपास करत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पीडितेच्या पतीसह सासरच्यांवरही गुन्हा दाखल
पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहितेवर अत्याचार करुन गावातील चावडीला असलेल्या खांबाला बांधून ठेवल्याच्या घटनेत मोठी घडामोड झाली असून सदरील विवाहितेचा बालवयात विवाह झाला होता, हे तिने पोलीस फिर्यादीत दिलेल्या जबाबातून समोर आले. त्यानुसार, आता तिच्या पतीसह आई-वडील व सासू-सासरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा बालविवाह होत असताना कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणात गावचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. पुढील तपासात पतीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, अशी माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली.