जगभरात आज व्हॅलेन्टाईन डे साजरा केला जात आहे. अशातच आज उत्तर प्रदेशातील नोएडा येथून खळबळजनक घटना समोर आली आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 107 जवळ रस्त्याच्या कडेला एक कार बराच वेळ उभी होती. ही कार पाहून स्थानिकांना संशय आला.
काही लोक या कारच्या जवळ गेले तेव्हा त्यांना समोरच्या सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले एक जोडपे पहायला मिळाले. यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. यानंतर सेक्टर 39 पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी कारचा दरवाजा उघडला आणि दोघांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झालेला होता.
माहितीनुसार, बॉयफ्रेंडने आधी गर्लफ्रेंडवर गोळी झाडली. त्यानंतर बॉयफ्रेंडने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील मृत तरुणाचे नाव सुमित असून तो दिल्लीच्या त्रिलोकपुरी भागातील रहिवासी आहे. तसेच या घटनेतील तरुणीचे नाव रेखा असे असून ती नोएडातील सेक्टर 58 येथील रहिवासी आहे. हे दोघे एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत होत आणि या दोघांमध्ये प्रेम प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत्यूआधी सुमितने रेखाला एक मेसेज केला होता. त्याने म्हटलं होतं की, 'मी आत्महत्या करायला जात आहे. त्यास रेखा जबाबदार आहे. १५ वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या रेखाने लग्नाचं वचन दिलं होतं. परंतु ती दुसऱ्या मुलासोबत लग्न करत आहे. यामुळे मी आत्महत्या करत आहे. कारण रेखाने मला धोका दिला आहे. मी आता आत्महत्या करत आहे'.
पोलिसांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टनंतर दोघांच्या मृत्यूचं कारण समोर येईल. प्राथमिक तपासानुसार तरुणाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.