मालिकेत दोनदा बोहल्यावर चढलेली 'काव्या' म्हणजेच लाडकी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आता खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकली आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' म्हणणाऱ्या ज्ञानदाने अखेर तिचा दीर्घकाळाचा प्रियकर हर्षद आत्मारावच्या गळ्यात वरमाला घातली असून, त्यांच्या साध्या पण तितक्याच देखण्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराई पाहायला मिळत आहे.
एकामागून एक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अपूर्वा गोरे-अंशुमन जोशी यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर अभिनेता गौरव मोरेनेही लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अभिनेत्री गायत्री दातारचंही नुकतंच लग्न पार पडलं. आता मालिकाविश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने प्रियकर हर्षद आत्मारावसोबत लग्न केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला फक्त जवळचे नातेवाईक आणि खास मित्रपरिवार उपस्थित होता. ज्ञानदाच्या लग्नाचे सुंदर 'HD' फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, या कपलने त्यांच्या लग्नासाठी HD Love हा खास हॅशटॅग ठेवला आहे. चाहत्यांकडून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. लग्नासाठी ज्ञानदाने जांभळ्या रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसली होती. तिचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. त्यानंतर मंगलाष्टकांच्या वेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. साधेपणातही तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं.
ज्ञानदा आणि हर्षद हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 2019 पासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल फारसा गाजावाजा केला नव्हता. अखेर अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ज्ञानदा सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती काव्या हे पात्र साकारत आहे. विशेष म्हणजे, मालिकेमध्ये काव्याचं दोन वेळा लग्न दाखवण्यात आलं आहे. आता मालिकेनंतर खऱ्या आयुष्यातही ज्ञानदाने लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. ज्ञानदाच्या लग्नाचे फोटो पाहून अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. साधेपणाने पण पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्याने सध्या मनोरंजनविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.