तगडी स्टारकास्ट असूनही खेळ संपला! टीआरपीच्या खेळात 'ही' मालिका ठरली दुर्दैवी ,केवळ ७ महिन्यांत बंद
तगडी स्टारकास्ट असूनही खेळ संपला! टीआरपीच्या खेळात 'ही' मालिका ठरली दुर्दैवी ,केवळ ७ महिन्यांत बंद
img
Jayshri Rajesh



मुंबई:  मराठी मालिका विश्वात सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत असून स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नशीबवान' या मल्टिस्टारर मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अवघ्या सात महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेला सुरुवातीच्या काळात उत्तम टीआरपी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र, नंतरच्या काळात टीआरपीमध्ये झालेल्या घसरणीमुळे ही मालिका कायमची बंद करण्याचा निर्णय वाहिनीकडून घेण्यात आला आहे.

छोट्या पडद्यावर सर्वोच्च स्थान आणि टीआरपी टिकवून ठेवण्यासाठी विविध वाहिन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू असते. याच पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या गाजावाजात स्टार प्रवाहवर 'नशीबवान' मालिका रात्री ९ च्या प्राइम टाइम स्लॉटमध्ये सुरू झाली होती. या मालिकेत आदिनाथ कोठारे, नेहा नाईक, सोनाली खरे आणि अजय पूरकर यांसारख्या दिग्गज मराठी कलाकारांची तगडी फौज होती.

उत्तम कथानक आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे पहिल्या काही आठवड्यांतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आणि टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान गाठले.

परंतु, कालांतराने प्रतिस्पर्धी वाहिनीवरील मालिकांच्या तगड्या स्पर्धेमुळे 'नशीबवान'च्या टीआरपीमध्ये मोठी घसरण झाली. घसरलेला टीआरपी सुधारण्याच्या प्रयत्नात वाहिनीने काही काळापूर्वी या मालिकेची वेळ बदलून ती दुपारच्या सत्रात म्हणजे दुपारी अडीच वाजता केली होती.

 वेळ बदलूनही मालिकेच्या लोकप्रियतेत फारसा फरक न पडल्याने अखेर वाहिनी व्यवस्थापनाने ही मालिका गुंडाळण्याचा निर्णय घेतला. या मालिकेचा थरारक असा शेवटचा भाग २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी अडीच वाजता प्रसारित करण्यात आला आहे.

दरम्यान, वाहिनीवर सध्या जुन्या मालिकांचा गाशा गुंडाळत असताना नव्या कोऱ्या मालिकांची जोरदार एन्ट्री होत आहे. 'नशीबवान' मालिका बंद झाल्यानंतर आता त्या वेळेत म्हणजे दुपारी अडीच वाजता 'तुझ्या सोबतीने' ही मालिका दाखवली जाणार आहे. 

२७ एप्रिलपासून रात्री १० वाजता 'बाई तुझा आशीर्वाद' ही नवी मालिका रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सायंकाळी साडेसहा वाजता 'वचन दिले तू मला' ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. केवळ ७ महिन्यांच्या आतच लोकप्रिय मालिका अचानक बंद झाल्यामुळे काहींनी ही मालिका बंद होत असल्याने नाराजी व्यक्त केली, तर काहींनी आनंदही व्यक्त केला.


इतर बातम्या
Join Whatsapp Group