अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. यामध्ये तिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. मात्र आता अचानक तिने या मालिकेला रामराम केला आहे.
या मालिकेत आता तेजश्रीच्या जागी दुसरी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीने अचानक ही मालिका का सोडली, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात असतानाच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.
इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या तेजश्रीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने जे लिहिलंय, त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
साडीमधील सुंदर फोटो पोस्ट करत तेजश्रीच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही.’ या कॅप्शनच्या हॅशटॅगमध्ये तिने लिहिलंय, ‘तुम्ही ज्याचे पात्र आहात त्यापेक्षा कमी गोष्टींसाठी अजिबात तडजोड करू नका’, ‘तुम्ही महत्त्वाचे आहात’, ‘देवाकडे तुमच्यासाठी नेहमीच प्लॅन तयार असतो’, ‘हॅपी लाइफ’. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तेजश्रीने ही पोस्ट लिहिल्याने त्यावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
तेजश्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून बऱ्याच वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केलं होतं. ही मालिका सुरळीत सुरू होती. त्याचवेळी तेजश्री ‘तदेव लग्नम’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेचं शूटिंग आणि चित्रपटाचं प्रमोशन या सर्व गोष्टी ती करत होती. मात्र अचानक तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.