मुंबई : 'झी'ने प्रेक्षकांच्या लाडक्या आणि जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या एका कार्यक्रमाची घोषणा केली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतंच एका मालिकेतून या जुन्या मालिकेच्या नव्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे.
झी वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वाची घोषणा अगदी हटके स्टाईलमध्ये करण्यात आली आहे.
'झी मराठी'वरील सध्या गाजत असलेल्या 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेच्या एका भागात खुद्द संकर्षण कऱ्हाडेने हजेरी लावली. याच भागात त्याने 'आम्ही सारे खवय्ये'च्या पुनरागमनाचं 'गुपित' फोडलं!
त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा नंबर वन येण्यासाठी 'झी मराठी' वाहिनीने जोरदार कंबर कसल्याचं दिसतंय. एकामागोमाग एक नव्या मालिकांची घोषणा करत आहे.
'आम्ही सारे खवय्ये' या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे.
मालिकेत संकर्षण तिलोत्तमासोबत गप्पा मारत होता. तिच्याशी बोलताना तो अचानक म्हणाला, "तू ऐकलंस का? 'आम्ही सारे खवय्ये' परत येतंय!" त्याच्या या एका वाक्याने प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप लगेच व्हायरल झाली आणि चर्चांना उधाण आलं.