मराठी अभिनेत्याचं फडणवीसांना खास पत्र ; नेमकं या पत्रात काय होतं? वाचा
मराठी अभिनेत्याचं फडणवीसांना खास पत्र ; नेमकं या पत्रात काय होतं? वाचा
img
Dipali Ghadwaje
प्रसिद्ध कलाकार प्रसाद ओक यांचा 31 जानेवारी 2025 रोजी मुक्काम पोस्ट देवाचं घर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपल्या जवळच्या सिनेमागृहात हा चित्रपट चाहत्यांना पाहता येणार आहे. पण त्याअगोदर एका पत्राची चर्चा रंगलीय.

प्रसाद ओक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच  पत्र लिहिलंय. पत्राद्वारे त्यांनी मनातील भाव व्यक्त केल्याचं म्हटलं जातंय.   प्रसाद ओक यांनी पत्रात म्हटलंय की, माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य. मराठीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट निर्माण होत आहेत. पण प्रत्येक चित्रपटाला मोठ्या निर्मात्याचं किंवा मोठ्या स्टुडिओचं पाठबळ मिळतंच, असं नाही.

अशा वेळेला त्या चित्रपटांना गरज असते, ती चांगल्या थिएटरमध्ये प्राईम टाईम शोची. असे शो जर या चित्रपटांना मिळाले, तर त्यांचा फायदा होवू शकतो. आर्थिक नफा होवू शकतो. आर्थिक नुकसानीपासून असे चित्रपट निर्माते वाचू शकतात. या विषयावर वारंवार बोलणं झालं…तक्रारी झाल्या. पण यावर अजूनही ठोस असा उपाय निघाल्याचं दिसत नाही.

आपण मराठीचे चाहते आहात. मराठीवर निस्सीम प्रेम करणारे आहात. आपल्या हक्काच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्काच्या मराठी सिनेमाला वारंवार ही मागणी का करावी लागते? याची खंत वाटते. आपण यावर त्वरित तोडगा काढाल अशी अपेक्षा वाटते. आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत कलासृष्टीचा नम्र सेवक प्रसाद ओक, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

प्रसिद्ध कलाकार ‘प्रसाद ओक’ यांनी माननीय मुख्यमंत्र्‍यांना खास पत्र लिहिलंय. पत्र लिहून त्यांनी मनातील भाव व्यक्त केलेत. ‘ मुक्काम पोस्ट देवाचं घर..’ या सिनेमासंदर्भात प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागलीय. 31 जानेवारी रोजी हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.



 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group