विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एका हनीट्रॅपच्या प्रकरणाची चर्चा आहे. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी तर विधानसभेच्या सभागृहात थेट पेनड्राईव्ह दाखवला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
या विषयावर आणि त्यातील आरोपांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर भूमिका मांडली.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
“कालपासून एका गोष्टीची सातत्याने चर्चा या सभागृहात होत आहे ती म्हणजे हनीट्रॅप. पण, हनीट्रॅप प्रकरणाची कोणतीही तक्रार आलेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच, मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपच्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. ना हनी आहे, ना ट्रॅप आहे, असं देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.
कोणतं हनीट्रॅप विरोधकांनी या सभागृहात आणलं ते मला समजतच नाही. नानाभाऊंनी कुठला बॉम्बच आणला म्हणे. पण नानाभाऊ तो बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला पाहिजे ना? ना हनी आहे, ना ट्रॅप आहे. नानाभाऊ कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. इकडे आजी मंत्री आहे तिकडे माजी मंत्री आहे. आजी मंत्री आहे की माजी मंत्री आहे? कोण फसलं आहे हनीट्रॅपमध्ये? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात कुठल्याही आजी-माजी मंत्र्याच्या हनीट्रॅपची तक्रार नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, हनीट्रॅप संदर्भातील एक तक्रार आली होती. नाशिकच्या संदर्भात ही तक्रार आली होती. एका महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात ही तक्रार होती”, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.