".... तर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल" ; राज ठाकरेंचा फडणवीस सरकारला इशारा
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही. शेजारच्या गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही, मग आपल्याकडेच का? शाळेत हिंदी शिकवली तर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर त्यांनी तसं समजावे, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. 

महाराष्ट्रातील प्रत्येकाने हिंदी सक्तीला विरोध करायला हवा, आज आवाज उठवला नाही, तर उद्या सर्व हिंदीकरण होईल, असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील प्रत्येक स्थानिक पक्षांनी हिंदी सक्तीला विरोध करावा, असेही आवाहन राज ठाकरेंनी केले.

हिंदी सक्तीची सरकारचे धोरण नेमकं काय आहे, ते समजत नाही. राज्य सरकार हिंदी सक्ती का लादतेय? सरकारावर कुणाचा दबाव आहे. यामागे आयएएस लॉबी आहे का? महाराष्ट्रात हिंदी सक्तीची चालणार नाही.

सरकारच्या छुप्या हेतूला कुणीही बळी पडू नका. मुख्याध्यापकांनी सरकारचे मनसुबे उधळून लावावेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाने कठोर शब्दात बोलले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करण्याचा डाव आहे. पुस्तक छापाई सुरू आहे, याचा अर्थ हिंदी लादणार आहेत. हिंदी भाषा शिकवली जाणार नाही, याचा आदेश काढा, असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रत्येकाने हिंदी सक्तीच्या आदेशाला विरोध करायला हवा. शाळा हिंदी कसं शिकवात, हेच बघूयात. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते आव्हानच समजावे. मोदी केंद्रात असताना गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही. मग महाराष्ट्रातच हे धोरण का राबवले जातेय. याला सर्वांनी विरोध दर्शवला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेच्या सक्तीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकारने शाळेत हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत दोन पत्रकं सरकारला पाठवल्याचे त्यांनी सांगितलं. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती सक्तीची करून देणार नाही.

राज्याचे शैक्षणिक धोरण महत्त्वाचा विषय आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली तर मनसे खपवून घेणार नाही. जर हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ आहे, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतर गोष्टींची सक्ती केली जाईल, असेही राज ठाकरे म्हणाले.

आज तिसरे पत्र पाठवले जाणार आहे. राज्यातील शाळेतील प्रत्येक मुख्याध्यापकांना राज ठाकरेंकडून पत्र पाठवले जाणार आहे. त्याबाबतचा मजकूर त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. एप्रिल महिन्यापासून शालेय शिक्षण विभागाचा गोंधळ आहे. हिंदी सक्तीची करण्याला मनसेचा विरोध असेल. हिंदी भाषेच्या सक्तीचा विषयच येत नाही. ती राज्य भाषा आहे. तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेशपासून कोणत्याही राज्यात हिंदी सक्तीची नाही. सहावी पाहूसन हिंदी असताना पहिलीपासून हिंदी सक्तीची का केली जातेय? यामध्ये केंद्राचा कोणताही विषय येत नाही. नेमकं काय राजकारण सुरू आहे, हे समजत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाला हे समजायला हवं. तुमचं राजकीय अस्तित्व संपवून टाकतील. तुम्ही मराठी आहेत, मराठी बोलता म्हणून तुम्ही मराठी आहात. राजकारण सोडून सर्वांनी एकत्र यायला हवं. उद्या सर्व विषयात हिंदी येऊ शकते. ते एकदा आले तर पुन्हा निघणार नाही, ते आजच ठेचायला हवं, असे राज ठाकरे म्हणाले. हिंदी सक्तीला सर्व राज्यांनी विरोध केला आहे. गुजरातसारख्या राज्यात (केंद्रात मोदी असताना) हिंदी लादू शकत नाही, तर महाराष्ट्रात का लादत आहेत, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group