देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल २५ वर्ष ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप युतीनं ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. येथे ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं.
मुंबईची निवडणूक यंदा सर्वार्थानं वेगळी होती. तब्बल २० वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत निवडणूक लढवली. ठाकरे बंधूंना ७१ जागी यश मिळालंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५, तर राज ठाकरेंच्या मनसेला ६ जागा मिळाल्या. आता मुंबई महानगरपालिकेतील या निकालानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे