राज ठाकरेंच्या मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास' ; वाचा सविस्तर
राज ठाकरेंच्या मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास' ; वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या वापरावरून सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण झाला आहे. मराठी भाषेचे  पदसाड मीरा रोड परिसरात अधिक उमटले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सकारात्मक आणि विधायक उपक्रम हाती घेतलाय. बोरिवली पश्चिम येथे अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम राबवण्यात आलाय.

मनसेच्या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुंबईत व्यवसाय करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवून त्यांचं स्थानिकांशी सुसंवाद अधिक सुलभ करणं असा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय. मनसे कार्यकर्त्यांसोबत बसून व्यापाऱ्यांनी मराठीची बाराखडी, मूलभूत शब्द आणि व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या वाक्यरचनांचं अध्ययन केलं.

दरम्यान एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आलाय.

एका व्यापाऱ्याने सांगितलं , 'आम्हाला येथे व्यवसाय करताना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी भाषा शिकण्याची संधी मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय'.

बोरिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, "मराठी ही केवळ भाषा नाही, तर येथील मातीची ओळख आहे. महाराष्ट्रात जी लोकं व्यवसाय करतात, त्यांनी स्थानिक भाषेचा आदर ठेवावा, हेच आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकत नाहीये, पण मराठी शिकण्याचा हा आग्रह निश्चितच पुढेही सुरू राहील'.

मिरारोडमध्ये मराठी भाषेचा वाद चिघळला होता, त्यानंतर मनसेच्या या उपक्रमाने सौहार्दाचा मार्ग निवडलाय. पुढील काळात मुंबईतील इतर भागांमध्येही 'मराठीची पाठशाळा' हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group