आगामी महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. सर्व पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या बैठकीत फक्त पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्तेच उपस्थित होते प्रसारमाध्यमांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला होता. या बंद दरवाजामागील मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीला तात्काळ लागण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. मी आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो. तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का ठेवता? मतभेद विसरा, एकत्र या आणि निवडणुकीच्या तयारीला लागा. मराठी अस्मितेसाठी मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज आयोजित केलेल्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
हे ही वाचा !
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं की, "विनाकारण कोणाला मारू नका, आधी समजवून सांगा. जर समोरचा व्यक्ती मराठी शिकायला आणि बोलायला तयार असेल, तर त्याला शिकवा. उर्मटपणाने वागणाऱ्यांशी वाद घालू नका. मात्र, जर कोणी उर्मटपणे बोलले, तर मग त्यानुसारच पुढची भूमिका घ्या, व्हिडिओ काढू नका" असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला आहे.