महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती.आता प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून प्रकाश महाजन हे पक्षात अस्वस्थ असल्याच दिसत होतं.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना हा मोठा धक्का बसला आहे, काही दिवसांआधी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आपली खदखद बोलून दाखवत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. गंगेला बोल लावला तेव्हा खरतर मी तेव्हाच थांबायला हवं होतं, मला वैयक्तिक अपेक्षा नव्हती, पदाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही अपेक्षा पण वाटेला उपेक्षा आली, असं म्हणत महाजन यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानं आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा धक्का मानला जात आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांची मनधरणी योग्य पद्धतीने झाली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ते मनसेच्या प्रमुख कार्यक्रमांपासून लांबच होते. प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधु आहेत.